| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष व नेतेमंडळीसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीयदृष्ट्या अस्तित्व व प्रतिष्ठा जपणारी बनली आहे. यावेळी जांभूळपाडा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होताना दिसत आहे.
सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून सुधागडच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी सुधागडातून जांभूळपाडा जिल्हा परिषदेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके हे निवडणूक लढवत आहेत. तर, त्यांच्या विरोधात नीलिमा धैर्यशील पाटील या निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. तर, परळी पंचायत समिती उमेदवार प्रणिता परदेशी या निवडणूक मैदानात ताकतीने उतरल्या आहेत. या मतदारसंघात सुधागड सन्मान समितीच्या उमेदवारांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात जाऊन प्रचार केला आहे. त्यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.
यावेळी बोलताना राजेश परदेशी म्हणाले की, ही निवडणूक मायबाप जनतेने पूर्णपणे हातात घेतली आहे. धनशक्ती आणि हुकूमशाहीच्या विरोधात आणि जे उमेदवार आपल्यावर लादले गेले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत. आता विरोधकांना पुन्हा संधी हवी आहे. परंतु, मागील 40 वर्षांत त्यांना सुधागडचा विकास करता आला नाही. मग पुढील पाच वर्षांत हे कोणता विकास करणार? यांच्याकडे विकासाचे काय धोरण आहे, असा सवाल परदेशी यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आम्ही गावोगावी प्रचार रॅलीचे आयोजन करत आहोत. या रॅलीत तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच चेहरे पहावयास मिळत आहेत. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मग ते कार्यकर्ते माझ्या पक्षातील असोत वा इतर पक्षातील असोत, ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून येत्या 9 तारखेला या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागलेला पहावयास मिळेल, असा विश्वास राजेश परदेशी यांनी व्यक्त केला.
जांभुळपाडा जिल्हा परिषद उमेदवार शर्मिला बोडके सुधागड वासियांना निवेदन करत म्हणाल्या की, मी कोणालाही न घाबरता निर्भीडपणे मैदानात उतरली आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ताकतीने लढायचे आहे, आणि सुधागडला जिंकवायचा आहे. तसेच, या विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न व समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही देखील उमेदवार बोडके व परदेशी यांनी दिली आहे.







