कर्जतचे सुधाकर घारे कोट्यवधींचे मालक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जाणारे अपक्ष सुधाकर परशुराम घारे हे अब्जाधीश आहेत. त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडील मालमत्तेचे विवरण दिले आहे. त्यात अनेक गाड्या सुधाकर घारे यांच्याकडे असून, वेगवेगळ्या भागात जमिनी तसेच घारे आहेत. घारे दाम्पत्याकडे तर स्थावर आणि जंगम अशी तब्बल 33 कोटींची मालमता असल्याचे नमूद केले आहे. त्याचवेळी घारे यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून, ते पदवीधर आहेत. त्यांनी 2021 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवी मिळविली आहे. दरम्यान, सुधाकर घारे यांच्यावर दोन कोटींचे कर्ज असून, त्यांनी एक कोटी दहा लाखाचे कर मागील वर्षी भरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते असलेले सुधाकर घारे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेना पक्षाकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला आहे. नामांकन अर्ज दाखल करताना सुधाकर घारे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात आपल्या कडील संपत्ती तसेच वाहने,सोने,कर्ज यांची माहिती दिली आहे. पात्रात सुधाकर घारे तसेच त्यांच्या पत्नी नमिता घारे यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

सुधाकर घारे यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा मुंबई जुहू पोलीस ठाणे येथील असून, अन्य दोन गुन्हे हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. त्या सर्व गुन्ह्यांचे स्वरूप हे मारझोड करणे, धमकावणे आणि फसवणूक करणे या स्वरूपातील आहेत. सुधाकर घारे यांच्याकडे स्थावर मालमता 24 कोटींची असून, ती खरेदी केलेली असल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी नमिता यांची स्थावर मालमता दीड कोटींची असून, जंगम मालमतामध्ये घारे यांची संपत्ती तीन कोटी 70 लाख एवढी असून, नमिता घारे यांच्याकडील जंगम मालमत्ता 35 लाखांची आहे. दोघांनी बांधकाम क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही 44 लाखांची आहे. अशी एकूण 33 कोटींचे मालक सुधाकर परशुराम घारे हे अपक्ष उमेदवार आहेत.

Exit mobile version