रेवंदडा आरोग्य केंद्रातील घटना; पोलिसात गुन्हा दाखल
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
महिला फिर्यादीने पतीला उपचाराकरिता रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुमारास आणले असता, भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या वरंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाने त्याठिकाणी येऊन काहीही संबंध नसताना अश्लील शिवीगाळ करुन तिला मारहाण केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेच्या पतीसोबत घरातील मंडळींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामध्ये महिलेचा पती जखमी झाल्याने त्यांना रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास माजी सरपंच सुधीर चेरकर याने रुग्णालयात जाऊन त्या महिलेला शिवीगाळी करून तिला मारहाण केली. यामध्ये ती महिला जखमी झाली. याप्रकरणी सुधीर चेरकरविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अनुष्का पुळेकर करीत आहेत.
तपासिक अंमलदाराकडून माहिती देण्यास टाळाटाळ
भाजपच्या कार्यकर्त्याकडून एका महिलेला मारहाण करण्यात आली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यातील तपासिक अंमलदार यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. कोणताही गुन्हा घडला नसून, तपास माझ्याकडे काहीच नाही असे बोलून त्यांनी या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
