सुधीर चेरकरला पोलीस कोठडी

| अलिबाग । प्रतिनिधी ।

रेवदंडा येथील प्राथमिक रुग्णालयात एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी वरंडेचे माजी सरपंच सुधीर चेरकर याला अखेरपर्यंत पोलिसांनी जेरबंद केले. त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घरगुती वादावरून एका महिलेच्या पतीला मारहाण झाली होती. त्यामध्ये ते जखमी झाले होते. रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान सुधीर चेरकर यांनी रुग्णालयात जाऊन तेथील महिलेला अश्‍लील शिवीगाळी करत मारहाण केली होती. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करून फरार झालेल्या सुधीर चेरकरला शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. अखेर त्याला शुक्रवारी पहाटे लपून बसलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी जेरबंद केले. दुपारी अलिबाग येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सुधीर चेरकर यांचा गणेशोत्सव जेलमध्येच साजरा होणार आहे.

Exit mobile version