सुडकोली शाळेने पटकाविला तृतीय क्रमांक


। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाद्वारे घेण्यात आलेल्या उपक्रमात सुडकोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. शिक्षण विभागाकडून झालेल्या मुल्यांकनामध्ये शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची बौध्दीक व शारीरीक क्षमता वाढावी यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरु केले होते. या अभियनाद्वारे जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतून सांस्कृतिक, सामाजिक, व्यवसायिक, क्रिडा असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. अलिबागचे गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेत उपक्रम घेण्यात आले. शालेय स्तरापासूनच व्यवसायिक ज्ञान मिळावे यासाठी खाद्य महोत्सवदेखील अनेक शाळांमध्ये भरविण्यात आले. या सर्व उपक्रमांची माहिती ऑनलाईन स्वरुपात भरण्यात आली. त्याचे मुल्यांकन गटविकास अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या तालुका व केंद्र समितीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामध्ये सुडकोली शाळेने तृतीय क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, सुडकोली ग्रामस्थ, महिला मंडळ यांचे यासाठी मोलाचे योगदान राहिले.

Exit mobile version