वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग एसटी बस आगारातील कर्मचार्याने शनिवारी रात्री आगारातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ड्युटी लावणार्या अधिकार्यांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याने त्याने हा प्रकार केल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यापूर्वीदेखील असाच प्रकार मुरुड एसटी बस आगारात झाला.
ड्युटी लावणार्या अधिकार्यांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने मुरुड आगारातील चालकाने मागील दोन महिन्यांपूर्वी विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर शनिवारी (दि.13) अलिबाग आगारातील कर्मचारी विश्रामगृहाजवळ बसला होता. त्याने तेथील एका झाडाला अडकून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब तेथील कर्मचार्यांच्या लक्षात आल्यावर त्याला वाचविले. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा तयार केला. ड्युटी लावणारे अधिकारी चांगली वागणूक देत नाही, या कारणावरून त्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. याबाबत आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांना विचारणा केली असता, कर्मचारी दारु पिऊन होता. त्याला डबल ड्युटीवर जायचे होते. मात्र, प्रवासी नसल्याने ती ड्युटी रद्द केली. त्यावरून त्याने वाद घातला होता. या कर्मचार्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना बोलावून तात्काळ कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.