वडार कुटुंबीयांचा आरोप
| जत | प्रतिनिधी |
जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याचा मृतदेह रविवारी (दि.14) कृष्णा नदीवरील नव्या पुलाजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. अवधूत अशोक वडार (27) असे त्याचे नाव आहे. त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले. दरम्यान, वडार यांच्या नातेवाइकांनी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक व पंचायत समितीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलीस व रेस्क्यू फोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर येथील अवधूत वडार जत पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी (दि.13) जत येथून निघाले होते. सायंकाळी उशिरा घराकडे न परतल्यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी सकाळी बायपास रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्पेशल रेस्क्यू फोर्सने त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांच्या चौकशीत मृतदेह जत येथे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली. पंचनामा करून मृतदेह सिव्हिलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासात वडार यांचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वडार यांच्या नातेवाईकांनी काही आरोप केले आहेत. जत पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा अवधूत यांच्यावर दबाव होता. राजकीय पदाधिकाऱ्याचा स्वीय सहायक तसेच काही राजकीय मंडळींच्या त्रासामुळे, दबावामुळे अवधूत यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप व्यक्त केला आहे. अवधूत यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर समजूत काढल्यानंतर मृतदेह घेऊन ते सायंकाळी उशिरा इस्लामपूरकडे रवाना झाले.







