बांधकामामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा; प्रशासकांच्या कारवाईमुळे नेरळकरांना दिलासा
| नेरळ | प्रतिनिधी |
दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे नेरळ पूर्व भाग वारंवार पाण्याखाली जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील नाल्यात रेल्वे प्रशासनाकडून पाण्याच्या निचऱ्याला अडथळा निर्माण करणारे बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीवर असलेले प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी थेट रेल्वे प्रशासनाशी भिडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी हे बांधकाम अखेर तोडून नव्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीचे बांधकाम करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले आहे. त्यामुळे ही कारवाई नेरळकरांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
रेल्वे परिसरातील नैसर्गिक नाल्यावर रेल्वे प्रशासनाने केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे नेरळ पूर्व भागातील घरे पावसाळ्यात पाण्याखाली जात होती. त्यामुळे निर्माण नगरी, पाडा गेट परिसरातील नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. या गंभीर प्रश्नावर केवळ पत्रव्यवहार न करता नेरळ ग्रामपंचायतीवर असलेले प्रशासक सुजित धनगर यांनी आक्रमक भूमिका घेत त्याठिकाणी थेट पाहणी केली होती. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, रेल्वे विभागाला पिण्यास पाणी मिळणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. अखेर रेल्वे प्रशासनाने नरमती भुमिका घेत जुने बांधकाम तोडून नव्याने योग्य निचऱ्याचे बांधकाम केले. या नव्या बांधकामामुळे आता पावसाचे पाणी जलदगतीने वाहून जाणार असून नेरळ पूर्व भाग पाण्याखाली जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने धनगर यांच्या कारवाईनंतर केलेल्या नव्या बांधकामाची पाहणी प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी केली. यावेळी ग्रामसेवक अरुण कारळे, मंगेश ईरमाले, विजय भिसे आदी उपस्थित होते.
नेरळकरांच्या हितासाठी कठोर निणर्य
प्रशासक अधिकारी म्हणून सुजित धनगर यांनी आजवर अनेक कठोर निर्णय घेत नेरळकरांच्या हितासाठी ठोस योगदान दिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात नेरळ शहरात दोन वेळेचा नियमित पाणीपुरवठा सुरू झाला असून, ज्या भागात अद्याप पाणी पोहोचत नाही, तिथेही लवकरच पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या विद्युत बिलामध्ये मोठी सवलत मिळवून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासाठीही त्यांनी कठोर भूमिका घेतली असून प्रशासन अधिक गतिमान झालेले दिसत आहे. ज्या काळात राजकीय सत्ताधाऱ्यांनी नेरळकरांना संकटात टाकले, त्या कठीण परिस्थितीत प्रशासक म्हणून अनेक अडचणींना सामोरे जात सुजित धनगर यांनी प्रामाणिकपणे नेरळकरांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.







