। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा टेनिस स्टार सुमीत नागलची एकेरीतील एटीपी रँकिंगमध्ये मोठी प्रगती झाली आहे. कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 71 वे स्थान त्याला मिळाले आहे. गत आठवड्यात तो 77 व्या क्रमांकावर होता. पेरुगिया एटीपी चॅलेंजर स्पर्धेत तो उपविजेता राहिला. त्यामुळे त्याच्या रँकिंगमध्येही प्रगती झाली. येत्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत एकेरीत खेळणारा तो एकमेव भारतीय असणार आहे. त्याच्या नावावर आता 777 एटीपी गुण आहेत. गेल्या काही महिन्यांतील शानदार कामगिरीमुळे नागलच्या रँकिंगमध्येच केवळ सुधारणा झाली नाही, तर ऑलिंपिकमध्येही त्याचे स्थान निश्चित झाले. यंदाच्या वर्षात सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुसर्या फेरीत पोहोचला होता. मात्र, फ्रेंच स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. आता विम्बल्डन स्पर्धेनंतर लगेच पॅरिस ऑलिंपिक या महत्त्वाच्या स्पर्धेत नागल खेळणार आहे.







