उन्हाळी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा सल्ला
| माणगाव | सलीम शेख |
फेब्रुवारी-मार्च महिन्यात वाढणारे तापमान आणि त्याच काळात येणाऱ्या शालेय वार्षिक परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांवर दुहेरी ताण निर्माण होत आहे. एका बाजूला कडक उन्हामुळे शारीरिक थकवा, डोकेदुखी, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) यांसारख्या तक्रारी वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अभ्यासाचा व निकालाचा मानसिक ताणही जाणवत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत अत्यावश्यक ठरते.
उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता न करता येत नाही त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या सत्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. पुरेसे पाणी न पिणे, उपाशीपोटी घराबाहेर पडणे किंवा जड, तेलकट आहार घेणे यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे परीक्षा काळात हलका, पचायला सोपा आणि पौष्टिक आहार विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात घ्यावा. यासाठी आहारात सकाळी नाश्त्यात फळे, दूध, ताक किंवा लिंबूपाणी घ्यावे. कलिंगड, खरबूज, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आहारात समाविष्ट करावीत. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स व अति तिखट पदार्थ टाळावेत. परीक्षा केंद्रावर पाण्याची बाटली घेऊन जाण्याची परवानगी असल्यास सोबत ठेवावी.
मानसिक ताण कसा कमी कराल?
मानस शास्त्रज्ञांच्या मते, ‘पेपर कसा जाईल?' या चिंतेपेक्षा ‘आपण केलेला अभ्यास सर्वोत्तम पद्धतीने मांडायचा' यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. दर 45-50 मिनिटांच्या अभ्यासानंतर 5-10 मिनिटे विश्रांती घ्यावी. पुरेशी झोप किमान 7-8 तास परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. मोबाईल व सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा.
पालकांची भूमिका महत्त्वाची
परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षांचा ताण टाकू नये. सकारात्मक वातावरण, प्रोत्साहन व भावनिक आधार देणे अधिक उपयुक्त ठरते. निकालापेक्षा प्रयत्नांना दाद देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित शाळांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व पंख्यांची योग्य व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी आरोग्य जनजागृतीसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. दुपारच्या तीव्र उन्हात परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना वेळे आधी केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उन्हाळ्याचे वाढते चटके आणि परीक्षेचा ताण या दोन्हींचा समतोल राखत विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेतली, तर यश नक्कीच गाठता येईल. ‘आरोग्य चांगले, तरच निकाल उज्ज्वल' हे सूत्र लक्षात ठेवूनच या परीक्षा पर्वाला सामोरे जाण्याची गरज आहे.







