मुरुडमध्ये रंगणार उन्हाळी पर्यटन महोत्सव

15 एप्रिल ते 31 मे पर्यंत विविध कार्यक्रम
। मुरूड/जंजिरा । वार्ताहर ।
पर्यटनाच्या माध्यमातून मुरूडच्या एकंदरीत विकासाला चालना मिळेल आणि येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल या भावनेतून मुरुडच्या जय भवानी मच्छीमार सहकारी सोसायटी व कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण पर्यटन महोत्सवाचे आयोजन 15 एप्रिल ते 31 मेदरम्यान करण्यात आले आहे.

मुरुडची परंपरा तसेच खाद्यसंस्कृतीची जगाला ओळख करून देण्यासाठी पर्यटन आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ती लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याचा आनंद होत असल्याचे जय भवानी मच्छीमार सहकारी सोसायटी अध्यक्ष प्रकाश सरपाटील यांनी सांगतले.

ईल्डर वेस्ट अ‍ॅडवेंचरचे कोलाडचे संचालक तसेच पाण्यातील साहसी खेळांचे तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले महेश सानप तसेच गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अ‍ॅडव्हेंचर इंडियाचे संचालक मंगेश कोयंडे, पॅराग्लायडिंग क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील, जमिनीवरील आणि हवेतील साहसी खेळ मुरूड किनारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुरूडच्या पर्यटनवृद्धीसाठी सदैव प्रयत्नशिल असून पर्यटन महोत्सवात सक्रिय सहभागी असल्याचे पिस्क्वेअर एज्युस्पोर्ट्सचे संचालक प्रसाद चौलकर यांनी सांगितले. एकदरा बॅकवॉटरमध्ये कयाकिंग, पॅडलबोट, कॅनोयिंग, हाऊसबोट सारखे उपक्रम सुरू करणे, समुद्रकिनारी सुरू असलेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या जोडीला सी- राफ्टिंग, समुद्रकिनारी मोटर पॅराग्लायडिंग करणे आदी बाबींचा समावेश पर्यटन उपक्रमात आहे. याबाबत सर्व चाचण्या केल्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक महेश सानप यांनीसांगितले, तसेच स्कुबा डायव्हींग संदर्भात चाचण्या सुरू असून पद्मदुर्ग किल्ला परिसरात लवकरच स्कुबा डायव्हींगचा उपक्रमसुद्धा सुरू करण्यात येईल, असेदेखील यांनी सांगितले.

गायमुख टेकडी येथून मुरूड समुद्रकिनारी असलेल्या वॉच टॉवरपर्यंत झिप लाईनचा उपक्रम सुरू करता येईल. तसे झाल्यास ती राज्यातील सर्वात जास्त लांबीची झिप लाईन ठरेल आणि पर्यटकांची रेलचेल वाढेल, असा विश्‍वास तज्ज्ञ मार्गदर्शक मंगेश कोयंडे यांनी व्यक्त केला. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी मोलाचे कार्य करणारे कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी जय भवानी मच्छीमार सहकारी संस्था आणि प्रकाश सरपटील यांना मुरुड पर्यटन महोत्सवासाठी पुरेपूर सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version