माथेरान घाटात सुमोचा अपघात; प्रवासी थोडक्यात बचावले

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान घाटात सुमो कारला अपघात घडला. नेरळ-माथेरान येथील सर्वात अवघड समजला जाणारा जुमापट्टी एस टन येथे हा अपघात घडला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुढे न जाता मागे आल्याने वाहन थेट सुरक्षा रेलिंगवर जाऊन अडकले. सुदैवाने यात प्रवास करणारे सर्व पर्यटक थोडक्यात बचावले असून, या ठिकाणी आठवड्यातील ही तिसरी अपघाताची घटना असल्याचे बोलले जात आहे.
बुधवार, दि. 18 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून सहा पर्यटक माथेरान फिरण्यासाठी खासगी वाहन टाटा कंपनीची एमएच 04 बीडी 8666 या क्रमांकाची सुमो कार घेऊन आले होते. परंतु, एस टन येथे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन मागे येऊन रस्त्याच्या कडेला असणार्‍या सुरक्षा कठड्याच्या रेलिंगवर चढून अडकून पडले होते. सुदैवाने यात सर्व प्रवासी पर्यटक थोडक्यात बचावले आहेत. येथील टॅक्सी चालक व काही स्थानिक ग्रामस्थांनी या पर्यटकांना खाली उतरवण्यास मदत केली. या ठिकाणी अपघाताची ही आठवड्या भरात तिसरी घटना असून, आदल्या दिवशी याच ठिकाणी एक ऑटो रिक्षा माथेरानहून नेरळच्या दिशेने निघाली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा थेट सुरक्षा रेलिंग तोडून पलीकडील वाडीत जाणार्‍या रस्त्याच्या कडेला उलटी पडली, तर आणखी एका मोटारसायकलचादेखील येथे अपघात घडला होता. या तीनही अपघातात प्रवास करणारे सर्व प्रवासी दैवबलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले आहेत.

Exit mobile version