तटकरे नव्हे, ‘कट’ करे; आ. जितेंद्र आव्हाडांचा घणाघात


| पेण | प्रतिनिधी |

32 रायगड लोकसभा निवडणुकीचे इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारची जाहीर सभा महात्मा गांधी वाचनालयाच्या मैदानावर पार पडली. त्यावेळी बोलताना माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांचा खरपूस समाचार घेत तटकरेंचा लेखाजोखा पेणच्या जनतेसमोर मांडला. हे सुनील तटकरे नाहीत, हे तर सुनील कटकरे आहेत. यांनी पवारसाहेबांचे घर फोडले आहे. पवारसाहेबांनी याला काय कमी केलं होतं? घरात पाच-पाच पदं दिली होती. तरीही पवारसाहेबांंचे घर फोडले आहे, असा घणाघातही आव्हाडांनी केला.

2014 ला पराभव झाल्यानंतर आपल्याला सत्तेतच राहायला पाहिजे, असा पवार साहेबांच्या मागे भुन-भुन करणारे सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे आहेत. ज्यांना पहिल्यापासून भाजपासोबत जायचे होते. आज ज्यांनी पक्ष उभा केला, त्यांच्याविरूद्ध न्यायालयात चुकीचे भाष्य सुनील तटकरे करतात. पहिल्यांदा यांची मुलगी निवडून आली आणि पवार साहेबांनी तिला मंत्री केली. तरी पवार साहेबांनी काय केलं, असा प्रश्‍न विचारत असतील तर यापेक्षा दुर्दैव ते काय, असा टोलादेखील आव्हाडांनी लगावला.

सुनील तटकरे हे जेएसडब्ल्यूचे बाप आहेत. जेएसडब्ल्यूमधून यांना सतत रसद पुरविली जाते. मग प्रदूषण कितीही झाले तरी यांना काही फरक पडत नाही. पुढे जितेंद्र आव्हाड यांनी बाळगंगा प्रकल्पामध्ये तटरकेंनी कसा मलिदा खाल्ला याबाबतदेखील भाष्य केले. बाळगंगेची चौकशी होऊ नये म्हणून हे भाजपामध्ये जाऊन बसले आहेत. एवढे वर्ष मंत्री असून तुम्ही रायगडासाठी काय केलंत, हे एकदा तरी जनतेला समजू द्या. तटकरेंनी स्वतःचा आणि स्वतःच्या मुलांशिवाय इतर कोणाचाही विचार केला नाही. पवारसाहेबांसारख्या बाप माणसाला यातना देणार्‍या तटकरेंना नियती कधीच माफ करणार नाही. मी शेवटी एवढेच सांगेन की, या रायगडच्या मातीत तटकरेंना गाडल्याशिवाय रायगडचा विकास नाही.

गीतेंसाठी रायगडकर रस्त्यावर- आ. जयंत पाटील
ही रायगडची जनता गीतेंसाठी आता रस्त्यावर उतरली आहे. सुनील तटकरेंचा भ्रष्टाचार रायगडच्या जनतेला आता माहिती झाला आहे. आज पेण तालुका सिंचनापासून वंचित आहे, ते या तटकरेंमुळेच. खारेपाटाच्या जनतेच्या घशाला कोरड पडली आहे ती या तटकरेंमुळेच.


अनंत गीते हे आज रायगडचा सर्वाधिक मताधिक्य घेणारा खासदार या महाराष्ट्रात असतील, अशी मी प्रतिज्ञा घेतलेली आहे. आ. पाटील पुढे म्हणाले, तटकरेंकडे एवढा पैसा आला कुठून? हे पेणकरांनी विचारणे गरजेचे आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. मी माझ्या उत्पन्नाचा स्त्रोत जाहीरपणे सांगतो. असे सुनील तटकरे सांगू शकत नाहीत. मी सरकारचा आजतागायत आमदारकीचा एक रुपया पगारही घेतलेला नाही. मी माझ्या उत्पन्नातील 25 टक्के उत्पन्न गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो. पूर्ण देशात 170 च्या वर सीट मोदींच्या येणार नाहीत, असे मी ठामपणे इथे सांगतो आणि यापुढे तटकरे रायगडमध्ये दिसणार नाहीत, हेही सांगतो.

तटकरेंचा बुरूज ढासळला आहे- अनंत गीते
सध्या रायगडामध्ये अशा काही तोफा धडधड करतात, त्यामुळे तटकरेंचा बुरूज पुरता नेस्तनाबूत झाला आहे. त्याला आता कुणीही वाचवू शकत नाही. जरी आमदार रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो बुरूज आता काही वाचवता येणार नाही.


अबकी बार सुनील तटकरे रायगडमधून हद्दपार. 2024 मध्ये रायगडच्या राजकारणातून सुनील तटकरे यांचा राजकीय अंत माझ्या हातूनच होणार होता, म्हणूनच मला ही नियतीने संधी दिली आहे. मला सर्वांना आवाहन करायचे आहे की, मतदान करायचे आहे, आपल्याला मतं विकायची नाहीत आणि आपण सुज्ञ आहात, आपण मत विकणार नाहीत तर आपण मलाच मतदान करणार, असा विश्‍वास अनंत गीते यांनी दर्शविला. या सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी केले. सभेसाठी व्यासपीठावर शेकापचे सुरेश खैरे, महादेव दिवेकर, पी.डी. पाटील, अतुल म्हात्रे, काँग्रेसचे राजा ठाकूर, चंद्रकांत पाटील, विष्णूभाई पाटील, अविनाश म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, दिपश्री पोटफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमची निष्ठा रायगडाशी- शेख सुभान अली
शेख सुभान अली हे हिंगोलीवरून खास करून अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आले होते. हे अल्पसंख्याक असून, स्वतःची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असलेली श्रद्धा आणि रायगडाप्रती असलेले प्रेम त्यामुळे ते आज पेणमध्ये महायुतीविरूद्ध बोलत होते. त्यांनी भरसभेत सांगितले की, मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लीम मावळा आहे. आमची निष्ठा ही रायगडाशी आहे. आज रायगडची शेती विकू पाहणार्‍या या दलालांचे मनसुबे आम्ही कधीच पूर्ण करू देणार नाहीत. रायगडच्या माती-मातीत शेतकर्‍यांच्या राजाची श्रद्धा आहे. ज्या राजाने शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी सक्त ताकीद दिलेली, त्या राजाच्या राजधानीत आज आपल्याला निष्कलंक अनंत गीते यांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन केले.


आमची लढाई हुकूमशाहीविरूद्ध- उल्का महाजन
आम्ही कुणा राजकीय पक्षाला मानत नाहीत. आम्ही संविधानाला मानतो. या देशाचे संविधान आज धोक्यात आहे, ते वाचविण्यासाठी आम्ही वाड्या-वस्त्यांवर फिरत आहोत. ‘अबकी बार 400 पार’ हा नारा संविधान बदलण्यासाठीच आहे. त्यामुळे आमची लढाई या मोदी-शहा या हुकूमशाहीविरूद्ध आहे.

Exit mobile version