| पेण | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना महायुतीमधून उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते विरुद्ध नेते अशी लढाई रंगलेली पाहायला मिळत आहे. नेते मंडळींची गळाभेट झाली; परंतु कार्यकर्ते मानायला तयार नाहीत. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने भ्रमनिरास झालेले भाजपचे कार्यकर्ते संतापले आहेत. खा. तटकरे विश्वासघातकी असून, त्यांच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवणार, असा घणाघात पेण तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी केला.
खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा दिल्लीला पाठवले नाही तर रायगडचा फायदा होईल एवढे नक्की. दर वेळेला शब्द फिरवण्याचे राजकारण करणाऱ्या सुनील तटकरेंचा पराभव झाल्यास रायगडला खऱ्या अर्थाने राजकारणात युवकांना नवसंजीवनी मिळेल. आजपर्यंत रायगडच्या तरुण राजकीय मंडळीला संपवण्याचे काम खासदारांनी केलेले आहे. ज्यांनी ज्यांनी यांना मदतीचा हात दिला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दर निवडणुकीला नवीन भिडू. खासदारांना पुन्हा महायुतीमधून उमेदवारी दिली असेल; परंतु आम्हा कार्यकर्त्यांना कदापि मान्य नाही. ज्या व्यक्तीने आपल्या राजकीय दोन्ही गुरूंवर (बॅ.ए.आर.अंतुले साहेब, शरद पवार साहेब) यांच्यावर कुरघोडी केली. तसेच मित्र समजणाऱ्या जयंतभाईंचा विश्वासघात केला, अशा विश्वासघातकी माणसावर आम्ही विश्वास का ठेवावा?
गेल्या 2019 च्या निवडणुकीत पेण तालुक्याने चांगलं मताधिक्य दिलं; परंतु विधानसभेला आमच्याविरुध्द काम केले. गेल्या निवडणुकीत शेकापची मदत घेतली. या निवडणुकीत आता भाजपची मदत घेणार. दर वेळेला दुसऱ्याच्या मदतीने निवडून यायचे आणि नंतर पाठ फिरवायची. यावेळेला हे चालणार नाही. आम्ही मदतीचा हात देणार नाही. विश्वासघातकी माणसावर आम्ही विश्वास ठेवणार नाही, असे स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले.






