तटकरेंना फुटला घाम !

शेकाप हाच विजयाचा कॉमन फॅक्टर

| रायगड | खास प्रतिनिधी |

अनंत गीते आणि सुनील तटकरेंचा आमना-सामाना या आधी दोन वेळा झाला आहे. आता तिसऱ्यांदा लढण्यासाठी दोन्ही उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. 2019 साली राष्ट्रवादीचे तटकरे विजयी झाले होते, तर 2014 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेचे गीते यांनी तटकरेंना चारी मुंड्या चित केले होते. दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये एक कॉमन फॅक्टर होता; तो म्हणजे शेकाप. आज शेकाप हा गीतेंच्या पाठीशी असल्याने तटकरेंना मतांची बेगमी करताना घाम फुटल्याचे चित्र आहे.

2009 साली देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. त्यामध्ये कुलाबा मतदारसंघ संपुष्टात येऊन रायगड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. त्यावेळी काँग्रेसकडून बॅ. ए.आर. अंतुले व गीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेनेच्या गीते यांना चार लाख 13 हजार 546 (53.8 टक्के) तर, अंतुले यांना दोन लाख 67 हजार 25 (34.7 टक्के) मते मिळाली होती. या लढतीमध्ये गीते मोठ्या फरकाने विजयी झाले होते. खासदारकीचा गीतेंना प्रदीर्घ अनुभव असल्याने 2014 च्या निवडणुकीत तटकरे अगदीच नवखे होते. दोन्ही उमेदवारांनी प्रचारामध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती. जिल्ह्यात जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. त्यानुसारदेखील रणनीती आखण्यात आली होती. परंतु, याउपरही गीतेंचे शेकाप हे बलस्थान होते. शेकापच्या मतदारांना आमदार जयंत पाटील यांनी एकनिष्ठ ठेवले आहे. मतदारांचा आमदार पाटील यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच गीतेंना निवडणुकीत विजय मिळविणे सोपे झाले.

पुढे 2019 च्या निवडणुकीत तटकरे हे आमदार पाटील यांच्या जवळ आले होते. जिल्हा परिषदेमध्येही शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती होती. त्यामुळे या कालावाधीत बहुतांश निवडणुका त्यांनी युतीमध्ये लढल्या होत्या. त्यामुळे 2019 साठी तटकरेंना आमदार पाटील यांनी पाठिंबा दिला आणि त्यांना निवडूनदेखील आणले होते. 2014 आणि 2019 मध्ये शेकापचा हात ज्याच्या डोक्यावर होता, तो उमेदवार निवडून आला होता, हे काही आता लपलेले नाही. त्यामुळे गीते आणि तटकरेंच्या विजयामध्ये शेकाप हा विजयासाठीचा कॉमन फॅक्टर असल्याचे अधोरेखित होते. 2024 ची निवडणूकही देश आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी आहे. देश आणि संविधान बुडवायला निघालेल्या भाजपाच्या गोटात तटकरे सामील झाला आहेत. त्यामुळे शेकापने गीतेंना विजयी करण्याचा चंग बांधला आहे. शेकाप गीतेंच्या बाजूने राहणार आहे, शिवाय भाजपाच्या विविध अन्यायकारक धोरणांवर नाराज असलेले मुस्लिम, दलित, ओबीसी हेदेखील इंडिया आघाडीच्या गीते यांच्याच बाजूने उभे राहिले आहेत. तसेच भाजपाने या मतदारसंघावर हक्क सांगितला होता. मात्र, त्यांना तो मिळाला नसल्याने त्यांच्यामध्येदेखील नाराजी असल्याचे दिसते. त्यामुळे तटकरेंसाठी दिल्लीची वाट बिकट असल्याचे चित्र आहे.

2014 च्या निवडणुकीत
गीतेंना तीन लाख 96 हजार 178 (38.63 टक्के), तर तटकरेंना तीन लाख 94 हजार 68 (38.43 टक्के) मते मिळाली होती.
2019 च्या निवडणुकीत
तटकरेंना चार लाख 86 हजार 968 (47.39 टक्के), तर गीतेंना चार लाख 55 हजार 530 (44.33 टक्के) मते मिळाली होती.
Exit mobile version