| रायगड | खास प्रतिनिधी |
देशभरात सर्वत्रच निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध माध्यमांचा वापर करीत आहेत. आपल्यालाच निवडून द्यावे यासाठी काही उमेदवार मोठ्या संख्येने पैसा खर्च करत आहेत. निवडणूक आयोगाने खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी प्रत्येक उमेदवारांना खर्चाची मर्यादा दिली आहे. केलेला खर्चाचा हिशोब हा जिल्हास्तरावरील यंत्रणेला सादर करावा लागतो. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 13 उमेदवारांपैकी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याने त्यांना सरकारी यंत्रणेने नोटीस बजावली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडत आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज आपापल्या उमेदवारासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. रायगड लोकसभेत इंडिया आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सुनील तटकरे यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे. त्याचप्रमाणे अन्य 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेदेखील आपल्या पद्धतीने प्रचार करुन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. लोकसभेसाठी उमेदवाराला 95 लाख रुपये खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराच्या खर्चाचा लेखाजोखा स्वतः त्यांनी आपल्या नोंदवहीत ठेवतानाच जिल्हा पातळीवरील सरकारी यंत्रणेलाही सादर करणे बंधणकारक आहे. सरकारी यंत्रणादेखील उमेदवारांच्या प्रचारावर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवून असते.
शनिवारी खर्च सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार शिवसेनेचे अनंत गीते यांनी 30 लाख 64 हजार 934 रुपयांच्या खर्चाचा हिशोब दिला आहे. वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांनी आठ लाख 55 हजार 625 रुपये, भारतीय जवान किसान पार्टीचे कर्नल प्रकाशराव चव्हाण यांनी 46 हजार 379 रुपये खर्च केला आहे. तसेच अन्य नऊ अपक्ष उमेदवारांनीदेखील खर्च सादर केला आहे. मात्र, सुनील तटकरे यांनी खर्च सादर केलेला नाही. खर्चाचा ताळमेळ बसवताना त्यांच्या प्रतिनिधींची चांगलीच दमछाक होत असावी, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती. नियमानुसार नोटीस बजावून तटकरे यांना आता 6 मे रोजी खर्च सादर करावा, असे आदेश संबंधित यंत्रणेने दिले आहेत.