। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने मागील लोकसभा निवडणूकीत तटकरे दिल्लीला गेले. मात्र, ते आता शेकापला संपविण्याची भाषा करीत आहेत. या पाच वर्षात फक्त घोषणाचा पाऊस पाडून सर्व सामान्य जनतेचा तटकरेंनी विश्वासघात केला. या विश्वास घातकी तटकरेंंना सात मे रोजी मतदान करूनच घरी बसवतील असा विश्वास माजी आ. पंडित पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ तटकरे यांनी शेकापला हद्दपार करणार असे सांगितले. त्यांना प्रतिउत्तर देताना शेकाप माजी आ. पंडित पाटील यांनी तटकरेंवर टिकास्त्र सोडले.
यावेळी माजी आ. पंडित पाटील म्हणाले, देश स्वातंत्र्य झाल्यापासून देशाच्या व राज्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची महत्वाची भुमिका ठरली आहे. जनतेबरोबरच शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवींशी बांधिलकी ठेवून शेतकरी कामगार पक्षाने काम केले आहे. रायगडसह राज्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाने ठाम भूमिका ठेवली. त्यामुळे आजही शेतकरी कामगार पक्षाचा राज्याच्या राजकारणात वेगळा दबदबा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सूनील तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाने निवडून दिले आहे. त्यामुळे ते दिल्लीला गेले. गेल्या पाच वर्षात पनवेल-इंदापूर रस्ता झाला नाही. प्रकल्प कागदावर राहिले आहेत. फक्त तटकरेंनी घोषणा करण्याचे काम केले आहे, अशी टिका पंडित पाटील यांनी केली.