जेईई, नीटच्या तयारीसाठी होणार फायदा
| रायगड | प्रतिनिधी |
ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना देशपातळीवरील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, म्हणून आता राज्यात लवकरच सुपर 50 हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राज्य सरकारसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. उत्पन्न कमी असलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेताना जेईई आणि नीट परीक्षेची पुरेशी तयारी करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची जेईई, नीट यांसारख्या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सुपर 50 हा उपक्रम राबविण्यात आला.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने या उपक्रमाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशच: अनुदानित शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असणार आहे. यात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोठेही विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्नाची कमाल मर्यादा दोन लाख इतकी असावी. उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक संस्था/शासकीय/खासगी प्रशिक्षण संस्थेत दोन वर्ष निवासी निःशुल्क प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम अर्धवट सोडता येणार नाही, असे प्रस्तावात नमूद केले आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, पुस्तके, अध्ययन साहित्य खर्च, निवास, भोजन, वाहतूक सुविधा या योजनेतून निवासी स्वरूपात निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
निवड चाचणी घेण्याचा प्रस्ताव
सुपर 50 उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा देणे अनिवार्य राहणार आहे. निवड चाचणीसाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होईल. या परीक्षेत उच्चतम गुण मिळालेल्या 100 विद्यार्थ्यांची निवड ङ्गसुपर 50फ उपक्रमात सहभागी होण्यासाठी केली जाईल.
प्रति जिल्हा दोन कोटी खर्च अपेक्षित
या उपक्रमासाठी प्रतिजिल्हा 100 विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. याप्रमाणे 36 जिल्ह्यांतून तीन हजार 600 विद्यार्थी निवडले जातील. प्रतिविद्यार्थ्याचा दोन वर्षांचा खर्च दोन लाख रुपये गृहित धरण्यात आला आहे.त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांसाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. याप्रमाणे एकूण 36 जिल्ह्यांसाठी 72 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने राज्य सरकारला पाठविलेल्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ‘सुपर 50’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी, त्या अनुषंगाने प्रस्ताव राज्य सरकारसमोर सादर करण्यात आला आहे. यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘नीट’ या परीक्षांची तयारी करून घेण्यात येणार आहे.
डॉ. महेश पालकर,
संचालक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग.
