भारतीय संघाचा सुपर विजय

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगली डबल सुपर ओव्हर

। बेंगलोर। वृत्तसंस्था ।

चिन्नास्वामीवर झालेल्या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने थरारक विजय मिळवला. हा सामना कोट्यवधी चाहत्यांच्या कायमच लक्षात राहणार आहे. कारण, या सामन्यात एक नाही तर दोन सुपरओव्हर झाल्या. दुसर्‍या सुपरओव्हरमध्ये रवी बिश्‍नोई याने तीन चेंडूमध्ये दोन बळी घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला. भारताने अफगाणिस्तानचा पराभव करून, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश संपादन केले.

तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचा डोंगर उभारला खरा पण अफगाण गोलंदाजीसमोर भारताची भक्कम फलंदाजी ढेपाळली. फक्त 22 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. विराट कोहली, संजू सॅमसन या सामन्यात अपयशी ठरले. तर शिवम दुबे आणि यशस्वी जायस्वाल यांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर रोहित आणि रिंकू यांनी 190 धावांची अभेद्य भागिदारी रचत 212 धावांचा डोंगर उभारला. रोहितने अवघ्या 69 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 121 धावांची खेळी केली. त्याला रिंकू सिंह याने नाबाद 69 धावा करत चांगली साथ दिली. रिंकू सिंह याने 39 चेंडूमध्ये सहा षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या. भारताच्या या विराट आव्हानाला अफगाणिस्तानकडून जशास तसे उत्तर देण्यात आले.

अफगाणिस्तानकडून गुरबाज, जादरन, गुलबादिन नैब आणि मोहम्मद नबी यांनी झंझावती खेळी केली. गुरबाज आणि जादरान यांनी 11 षटकात 93 धावांची सलामी दिली. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात सहा गड्यांच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारत सामना बरोबरीत सोडला त्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली.

अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपरओव्हरमध्ये 16 धावा कुटल्या. प्रत्युत्तरदाखल भारतालाही 16 धावाच काढता आल्या. त्यामुळे सामन्यानंतर सुपरओव्हरही बरोबरीत झाली. त्यामुळे दुसरी सुपरओव्हर घ्यावी लागली. दुसर्‍या सुपरओव्हरमध्ये भारताने बाजी मारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली. रवी बिश्‍नोई याने फक्त तीन चेंडूमध्ये अफगाणिस्तानच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना हजारो चाहत्यांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहणारा सामना झाला.

पहिली सुपर ओव्हर
भारत 16 धावा
अफगाणिस्तान 16 धावा
दुसरी सुपर ओव्हर
भारत 11 धावा
अफगाणिस्तान एक धाव
पाच शतके ठोकणारा पहिलाच खेळाडू
पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण बेंगलोरच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही.
Exit mobile version