पुरवठा विभागाचा ऑनलाईनचा सावळागोंधळ

नावे कमी करणे, वाढविण्यासाठी पाहावी लागतेय दोन महिने वाट

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

पुरवठा विभागाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंद करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. मात्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करण्यापासून वाढवण्याचे काम केल्यावर ऑनलाईन जलद गतीने होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुरवठा विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत लाभार्थ्यांना नवीन, दुय्यम शिधापत्रिका देणे, नाव वाढविणे, कमी करणे अशा अनेक प्रकारची कामे केली जात असताना धान्य भरणाबाबतची माहिती गोळा करण्याचे कामदेखील केले जाते. पूर्वी ही कामे ऑफलाईन पद्धतीने होती. पुरवठा विभागातील कामकाज गतिमान व्हावे, कामात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी पुरवठा विभागाचा कारभार ऑनलाईन करण्यात आला. धान्य भरण्याच्या नोंदीपासून नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, अशा अनेक प्रकारची कामेदेखील ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात एनआयसीद्वारे ऑनलाईन काम केले जाते. ऑनलाईनमुळे पुरवठा विभागाचे कामकाज कमी वेळेत होईल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. परंतु, ग्राहकांची फार मोठी निराशा झाली आहे.

नाव कमी करण्यापासून वाढविण्याच्या ऑनलाईन कामासाठी ग्राहकांना एक ते दोन महिने वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांचे मोठी गैरसोय होत आहे. ऑनलाईन नोंदीसाठी शिधापत्रिकावर असलेल्या व्यक्तींच्या आधारकार्डची छायांकित प्रत, शिधापत्रिकेची प्रत पुरवठा कार्यालयात जमा करूनदेखील तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. नाव कमी करताना वीस तारखेच्या आत अर्ज केल्यास एक महिना व वीस तारखेनंतर अर्ज केल्यास दोन महिने ऑनलाईन नोंदीसाठी वाट पाहावी लागत आहे. नवीन शिधापत्रिका ऑफलाईन मिळाल्यावर त्याची ऑनलाईन नोंदीसाठीदेखील महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

पुरवठा विभागाच्या या गोंधळाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पुरवठा विभागात वारंवार पायपीट करत ऑनलाईन नोंदीची माहिती घ्यावी लागते. मात्र, अनेक वेळा सर्व्हरची समस्या असल्याने आणखी काही महिने नोंदीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पुरवठा विभागाच्या ऑनलाईच्या सावळागोंधळ सर्वसाान्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

पुरवठा विभागात अपुरी कर्मचारी यंत्रणा असल्याने ही कामे वेळेवर होत नसल्याची माहिती समोर येत आहे. पुरवठा निरीक्षकांपासून अव्वल कारकून, लेखा कारकूनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही कामे जलदगतीने होत नसल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तो होऊ शकला नाही.

12 पुरवठा निरीक्षक अधिकार्‍यांची पदे रिक्त
रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, पनवेल या तालुक्यात पुरवठा विभागाचे पूर्ण वेळ पुरवठा निरीक्षक अधिकारी कार्यरत आहेत. मात्र पेण, कर्जत, अलिबाग, मुरूड, महाड, श्रीवर्धन, सुधागड, खालापूर, उरण, पोलादपूर, तळा, म्हसळा या तालुक्यांमध्ये अजूनपर्यंत पुरवठा निरीक्षक अधिकार्‍यांची पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त कारभार सोपविला जात असल्याची माहिती समोर येत आहे. अतिरिक्त कामाचा ताण या अधिकार्‍यांवर बसत आहे.
Exit mobile version