पूरग्रस्त गावांना सिद्धागिरी मठाचा आधार

काडसिद्धेश्‍वर महाराज स्वतः उतरले मदतकार्यात
| चिपळूण | प्रतिनिधी |
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणमधील अनेक गावांमध्ये महापूर तसेच भूस्खलन झाल्याने तेथे अनेक रस्ते मार्ग बंद आहेत. तरी अशा ठिकाणी लोकांच्या उदरनिर्वाहासाठी लागणार्‍या वस्तू आणि वैद्यकीय आरोग्य तपासणी सेवा श्री सिद्धागिरी मठ यांच्या वतीने सर्वांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
काडसिद्धेश्‍वर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी कणेरी मठातर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात सिद्धगिरी मठाची टीम क्रियाशील असून, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तुंचे किट तयार करून वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य सेवा पथकही सिद्धगिरी मठातर्फे कार्यरत आहे. नुकताच पूर ओसरत असतानाच पुराच्या दूषित पाण्याने साथीच्या रोगांचे संकट पसरत आहे. या संकटाला दोन हात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलमार्फत आरोग्य सेवा सुरु आहे. तिवरे आणि दादर (चिपळूण) तालुक्यातील दादर, रेक्टोली, आकले, इंदापूर आदी ठिकाणी एकूण 500 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या सिद्धगिरी मठातर्फे करण्यात आलेल्या मदतीसाठी तेथील नागरिकांनी सिद्धगिरी मठाच्या स्वामीजींचे आणि डॉक्टरांचे आभार मानले.

दरम्यान, महापुरानंतर कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी आपल्या असंख्य सेवेकरी मंडळींना घेऊन स्वतःही मदतकार्यात उतरल्याने चिपळूणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोबत कोल्हापूर येथील मठाचे अनुयायी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन प्रत्येक गरजवंतापर्यंत मदत कशी पोहचवता येईल याकडे विशेष लक्ष देऊन आहेत. गुरुवारपर्यंत एकूण 1500 जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप पूर्ण झाले. यामध्ये गृहोपयोगी एकूण 25 वस्तूंचा समावेश आहे. हेे मदतकार्य संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version