प्रचारासाठी समाज माध्यमांचा आधार

व्हॉट्सऍप, स्टेट्स, फेसबुकवरून कामांचा प्रचार; मतदानाचे आवाहन

| पाली/बेणसे | वार्ताहर |

ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार व कार्यकर्ते यांचा घरोघरी भेटीवर भर असला तरी प्रचारासाठी समाजमाध्यमांचा सुद्धा अधिक वापर होत आहे. व्हॉट्सऍप-फेसबुकवरून कामांचा प्रचार व आपल्यालाच किंवा आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. याचवेळी विरोधक देखील प्रतिस्पर्धी उमेदवारांवर समाज माध्यमांतून टीकास्त्र सोडत आहे.

जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशावेळी प्रत्येकाला भेटणे किंवा सतत त्यांच्या संपर्कात राहणे महत्वाचे आहे. पण वेळेच्या मर्यादेमुळे हे शक्य होत नाही. मग अशावेळी समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात कामी येत आहेत. जवळपास सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या पॅनलचे डिजिटल बॅनर व व्हिडीओ तयार केले आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअप यावर उमेदवार व कार्यकर्ते हे डिजिटल बॅनर टाकून मतांचा जोगवा मागतांना दिसत आहेत. शिवाय मागील पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा देखील समाज माध्यमांवर दिला जात आहे. सत्तेत असतांना केलेली कामे, राबविलेल्या योजना व उपक्रम यांचे फोटो, व्हिडीओ व माहिती प्रसारित केली जात आहे. याशिवाय अनेक जणांनी आपला अजेंडा देखील समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. यावर अनेकजण चांगल्या व टीकात्मक प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. तर काही उमेदवार व कार्यकर्ते समाज माध्यमांद्वारे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार समोर आणत आहेत. या सगळ्यात सामान्य मतदारांचे मात्र चांगले मनोरंजन होत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते व समर्थक विरोधात किंवा समर्थनार्थ प्रतिक्रिया टाकतात मात्र यावेळी त्यांच्यात वाकयुद्ध झालेले दिसते. आपलाच नेता किंवा उमेदवार कसा चांगला आहे हे दाखवण्याची खटाटोप सुरू आहे. काही वेळेला समाज माध्यमांवरील हा वाद शिगेला सुद्धा जात आहे. काही असले तरी उमेदवार व समर्थक या प्रभावी, मोफत व सहज उपलब्ध होणाऱ्या समाजमाध्यमांचा खुबीने वापर करत आहेत.

मोर्चे बांधणीसाठी प्रभावी
उमेदवार व विविध पक्षांनी आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे तात्पुरते व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. यावर सभा, भेटीगाटी, प्रचार आदींवर चर्चा, नियोजन केले जाते. शिवाव आढावा घेणे व व्युव्हरचना ठरवली जात आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बैठक घेण्यापेक्षा हे अधिक जास्त प्रभावी ठरत आहे. शिवाय वेळ व खर्च देखील वाचतो.

निवडणुकीच्या चर्चा
फेसबुक व्हॉट्सअपवर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर निवडणुकांची चर्चा रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे. कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली याचे विश्लेषण सुरू आहे. याद्वारे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या निवडून येण्याच्या व न येण्याच्या शक्यतांचा अंदाज बांधत आहेत. शिवाय आपल्यासोबत कोणकोण आहे किंवा नाही हे देखील समजून घेत आहेत.
शहरातील मतदारांना संपर्क
बहुसंख्य मतदार हे सहकुटूंब कामानिमित्त मुंबई, ठाणे व पुणे आदी शहरांत गेले आहेत. हे मतदार एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे समाज माध्यमांद्वारे या मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहिले जात आहे. त्यांना शुभेच्छा संदेश पाठविणे नियमित विचारपूस करणे. कामाची माहिती देणे अशा गोष्टी सुरू आहेत.
Exit mobile version