बुरूडकामातून संसाराला आधार – योगिता. गायकवाड

| माणगाव | वार्ताहर |

माहेर माणगाव तालुक्यातील तळेगाव येथील ललिता बळीराम भोवरे यांचे पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बुरूडवस्तीमध्ये राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि स्थानिक नेत्याचा खासगी वाहनचालक असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्यासोबत 1991 मध्ये लग्न झाले. लग्नावेळी त्यांचे नाव योगिता एकनाथ गायकवाड झाले. दोघांचेही शिक्षण जेमतेम होते. पती वाहन चालविण्यानिमित्त घराबाहेर असल्याने संसाराकडे फारसे लक्ष नसायचे, म्हणून रोजखर्च निघण्यासाठी तसेच संसाराला हातभार लावण्यासाठी योगिता वहिनींनी तातडीने बुरूडकामाचा पारंपरिक व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले आणि विश्‍वकर्म्याच्या आशीर्वादाने हाती असलेल्या बुरूडकलेचा वापर करण्यास सुरूवात केली. योगिता वहिनींनी कुटुंबाची एकहाती जबाबदारी स्वीकारत बुरूडकामाचा व्यवसाय नेटाने केला. कला आणि कलेतून मिळालेल्या जातीमध्ये आदर्श निर्माण केला. पोलादपूर तालुक्यातील चोळई बुरूडवाडीतील अन्य महिलांनाही अशा प्रकारच्या बुरूडकलेच्या माध्यमातून सौ.योगिता वहिनींनी प्रोत्साहित केले. पोलादपूर तालुक्यात गणपती गौरीच्या सणाला सुहासिनींचे माहेरवाशिणीचे गौरीचे वसे घेऊन जाण्यासाठी लागणारी बांबूची सुपं, सुपल्या तसेच परड्या, करंड्या, पाट्या, कणगे, डालगे, टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शो-पीस बनवून पोलादपूर शहरात विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा व्यवसाय कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम असूनही या गायकवाड कुटुंबाने परंपरा म्हणून जोपासलेला दिसून येत आहे.

Exit mobile version