सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निर्देश!

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत फुटीशी संबंधित प्रकरणामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना 19 मार्च 2024 रोजी दिलेल्या न्यायालयाच्या मागील अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. अजित पवार गटाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केला नसल्याच्या आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अजित पवार गटाने देखील शरद पवार गट अजूनही घड्याळ चिन्ह वापरत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, शरद पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. त्यांनी तुतारी वाजवणारा माणसू हे चिन्ह वापरावे. तर अजित पवार गटाने न्यायालयाच्या निर्देशानुसार घड्याळ चिन्ह वापरावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.घड्याळ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याबद्दल प्रचार करताना उल्लेख करा. तसेच पत्रके, बॅनर यावर देखील ठळक उल्लेख करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अजित पवार गटाने 19 मार्च 2024 ला कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. मात्र ही जाहीरात कोपर्‍यात असल्याचे न्यायलयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अधिक ठळकपणे सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे मान्य केले. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पदाधिकारी, उमेदवार आणि समर्थकांना सुचना दिल्या जातील असे देखील त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने शरद पवार गट आणि अजित पवार गट त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्‍वनाथन यांच्या खंडपीठासमोर दोन्ही गटाच्या अर्जांवर सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवारांची बाजू मांडताना अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती आणि पोस्टर्स छापील, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर सादर केल्या. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा दिशाभूल करणारा दावा केला.न्यायालयाने घड्याळ चिन्हाचा वापर हे न्यायप्रविष्ठ असल्याचा ठळक उल्लेख करण्याच्या सूचना अजित पवार गटाला दिल्या होत्या. मात्र अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंवर देखील थेट घड्याळ चिन्हा वापरल्या जाते, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

Exit mobile version