। पुणे । प्रतिनिधी ।
परभणी बंद दरम्यान हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. दरम्यान, त्यातील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्या आहेत, त्याचा खा. सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. यावर चर्चा होऊन महाराष्ट्राला उत्तरं मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीचा तुरुंगात मृत्यू होणे दुर्देवी आहे. याची चौकशी व्हायलाच पाहीजे. या आठवड्यात दोन-तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. राज्यात निवडणुकीचा निकाल लागून दोन ते तीन आठवडे झाले आहेत, परंतु राज्याला गृहमंत्रीच नाही. राज्यातील जनतेने इतके मोठे बहुमत दिले आहे, त्यामुळे सरकारने आतापर्यंत कामाला लगायला पाहिजे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नसल्याचे त्या म्हणाल्या.