बापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
माझ्या बापाचा व आईचा नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला. माझ्याबद्दल बोला. पण माझ्या बापाचा नाद करायचा नाही. मी महिला आहे. कुणी बोललं तर टचकण डोळ्यात पाणी येतं. पण संघर्षाची वेळ आली की, हीच महिला पदर खोचून मैदानात उभी राहते. तीच अहिल्या होते व जिजाऊही होते, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांना दिला. यावेळी बापाबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नसल्याचे सुप्रिया सुळे सांगत असताना मुलीबद्दल वाटणारा अभिमान शरद पवार यांच्या डोळ्यात दिसून आला. वडिलांसाठी पदर खोचून मैदानात उतरेलल्या मुलीचे भाषण ऐकून त्यांचे डोळे पाणावले होते.
काही जण पक्षातील वडिलधाऱ्यांना सांगतात की, तुमचे वय झाले, आता थांबा, अरे यांच्या पेक्षा आम्ही मुली बऱ्या, असेही त्या यावेळी अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या. काही जण पक्षातील ज्येष्ठांना घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे माझे मन अधिक घट्ट झाले आहे. वय केवळ आकडा असतो. आपल्यात जिद्द असली पाहिजे, असेही सुप्रिया यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला.
भाजप हा देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्ट पक्ष असल्याचा दावा करणाऱ्यांनीच आज राष्ट्रवादीत फूट पाडून संपूर्ण पक्षच तिकडे नेला, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर हल्लाबोल करताना केला. यावेळी त्यांनी शरद पवारांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांचाही तिखट समाचार घेतला. बापाला घरी बस म्हणणाऱ्या मुलापेक्षा मुलगीच बरी, असे त्या यासंबंधी म्हणाल्या.
पक्ष पुन्हा बांधू त्यात काही होणार नाही, 2019 मध्ये राष्ट्रवादीला 11 जागा मिळणार होत्या, पण तेव्हा शरद पवार बाहेर पडले आणि 54 आमदार निवडून आले. आजपासून भाजपच्या खोटारडेपणाविरुद्ध लढायचे, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही, फैजल आणि अलिल देशमुख यांच्यावर केस केल्या तरी ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. वय हा फक्त आकडा आहे, भाजपच्या विरोधात आता जिद्दीने लढणार. स्टेजवरील 8 ते 9 खूर्च्या रिकाम्या झाल्या आहेत तिथे नव्या उमेदवारांना संधी मिळणार असे म्हणत सुप्रीया सुळेंनी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.