| लातूर | प्रतिनिधी |
लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे बेदम मारहाण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर त्यांच्या पदावरुन उचलबांगडी झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गंभीर दखल घेत थेट सामाजिक माध्यमावरूनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.20) छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने प्रचंड शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. त्याचे संतप्त पडसाद राज्यात उमटले होते. छावा संघटनेसह इतर मराठा संघटनाही या घटनेमुळे आक्रमक झाल्या होत्या. या सगळ्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली होती. अजित पवारांनी सोमवारी (दि.22) दुपारच्या सुमारास समाज माध्यमावर पोस्ट करत लातूरमधील घटनेचा कडक शब्दात निषेध केला. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर सूरज चव्हाण सद्सद्विवेकबुद्धीला स्मरुन स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा देतील किंवा तशी घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अजित पवारांच्या पोस्टनंतरही सूरज चव्हाण यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्याची किंवा राजीनामा देण्याची तसदी घेतली नाही. परिणामी, अजित पवार यांनी लगेच दुसरी पोस्ट करत सूरज चव्हाण यांना जाहीरपणे तातडीने पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. अशी पोस्ट आल्यानंतर सूरज चव्हाण यांना नाईलाजाने का होईना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.







