| पाली/गोमाशी | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन सुधागड तालुक्यातील पाली या शहरात होणार आहे. नव्याने रुजू होत असलेल्या राजकीय संस्कृतीला छेद देत भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आजही आपला लालबावटा डौलाने फडकत ठेवलेला आहे. 76 वर्ष होतील, एकच पक्ष, एकच रंग आणि महाराष्ट्राचा विकास हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयाने शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते काम करत आहेत याची प्रचिती पुन्हा एकदा पाली येथे होणाऱ्या महामेळाव्यात युवराज संभाजीराजे छत्रपती याच्यां प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचा दावा असे शेकाप नेते सुरेश खैरे यांनी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला कृषीवलशी बोलताना केला आहे.
त्या ठिकाणी महाराष्ट्रातून तसेच शहरातून हजारो कार्यकर्ते वर्धापन दिन सोहळ्यासाठी येणार आहेत. तसेच येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे असे खैरे यांनी सांगीतले आहे.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आपण सर्व पाहत आहात. अशा प्रसंगी शेकापच्या वर्धापन दिनाला 75 वर्षे होत आहेत. या निमित्ताने शेकापचा इतिहास खूप मोठा आहे त्यानुसारच याची ध्येय धोरणे मनाशी बाळगून भविष्यात सुदृढ आणि समृद्ध महाराष्ट्र करू करण्यास आम्ही तयार आहोत शेकापच्या लालबावट्याखाली अजून जोमाने काम करू असे प्रतिपादनही त्यांनी केले.
वाहन पार्कींगसाठी तीन ठिकाणी नियोजन
रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या वर्धापन दिनानिमित्त येणार आहेत. वर्धापन दिनाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळेवर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचता यावे यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये याचे तीन ठिकाणी नियोजन केले आहे. येणाऱ्या वाहनांची पार्कींग व्यवस्था योग्य पध्दतीने करण्यात आली आहे.पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगावकडील कार्यकर्ते निजामपुर रवाळजे मार्गे पालीला येणार आहेत. त्यांची पार्कींग व्यवस्था पाली येथे रस्त्यालगत केली आहे. अलिबाग, मुरुड, पेण व रोहाकडील कार्यकर्ते वाकण मार्गे पालीकडे येणार आहेत. त्यांची पार्कींग व्यवस्था गावाच्या लगत केली आहे. पनवेल, उरण, कर्जत, खालापूरकडील कार्यकर्ते खोपोली – पाली फाटा मार्गे येणार आहेत. त्याची पार्कींग व्यवस्था पालीजवळ रस्त्यालगत केली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनानुसार वाहने पार्कींग करावीत असे आवाहन खैरे यांनी केले आहे.