सुरेश लाड यांचा सुधाकर घारेंना प्रश्न
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुधाकर घारे यांनी सुरेश लाड यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यावर माजी आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन 2017 मध्ये तुमचे काय झाले असते, असा प्रतिहल्ला केला. दरम्यान, आपण आयुष्यभर सांभाळ केलेल्या कार्यकर्त्यांनी मला नीतीमत्ता सांगू नये आणि सांगण्याचा प्रयत्नदेखील करू नये, अशी सूचना लाड यांनी केली. दरम्यान, तुमच्या पराभवाचे खापर फोडायला मीच दगड मिळालो काय, असा सवाल सुरेश लाड यांनी उपस्थित केला.
माजी आमदार सुरेश लाड यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एकनाथ धुळे यांनी आपली आपल्यावर नीतीमत्तेबद्दल बोलू नये. कारण, त्यांना मी आयुष्यभर सांभाळ केलेला आहे. अशोक भोपतराव यांनी आपल्यावर बोलून चांगले केले नाही, असे सांगत सुरेश लाड यांनी म्हटले आहे. भरत भगत यांनी मला बोलण्याचे आणि काही सांगण्याचे कारण नाही. 15 वर्षांत काय वेगळे केले की तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, असा प्रश्न लाड यांनी केला.
सुरेश लाड पुढे म्हणाले की, 2019मध्ये मला पराभव पहावा लागला, त्याचे शल्य आणि दुःख होते. पण, लोकशाहीत ते स्वीकारावे लागते आणि ते स्वीकारले आहे. थोरवे आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो. मात्र, राज्यात महायुती म्हणून एकत्र आलो आणि मित्रपक्ष म्हणून आम्हालाही त्यांच्यासोबत राहावे लागले आहे, असे स्पष्टीकरण दिले. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो आमदार प्रोटोकॉल पाळत नाही आणि त्याला विरोध करण्याचे काम मी दाखवले. मात्र, युतीधर्म पाळण्याची माझी जबाबदारी होती.
तटकरे कार्यकर्त्यांना फोन करून त्रास द्यायचे
अजित पवार तिकडे गेल्यावर शरद पवार यांच्याबरोबर राहून मला पक्षाचे काम करणे शक्य नव्हते आणि 15 तालुक्यांत कार्यालये उभारणे माझ्या आर्थिक कुवतीत नव्हती. त्यामुळे मी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. पवारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तटकरे यांचे कॉल येऊ लागले, कार्यकर्त्यांना कोंडीत पकडले जाऊ लागले आणि त्यामुळे मी भाजपात प्रवेश केला. रवींद्र चव्हाण आणि सतीश धारप यांनी प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शांत राजकीय जीवन जगण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये पाठबळ मिळणार असे वाटल्याने त्याच हेतूने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे लाड यांनी सांगितले.
कोणी कोणाचे कर्ज फेडत नाही
भाजप कर्ज फेडणार म्हणून भाजपमध्ये गेले, असे विरोधक म्हणत आहेत. परंतु, कर्ज फेडत नसल्याने मला नोटीस आली असून, मी वेळ मागितला आहे. त्यानंतरदेखील पैसे भरू शकलो नाही तर लिलाव होऊन माझे नुकसान होणार आहे. पण, त्यांनी मला कर्ज दिले, त्यांचे आभारच मानणार आहे. मी घेतलेले कर्ज फेडू शकलो नाही हे माझे अपयश आहे. त्यांचे पैसे घेतले असून, ते मी फेडणार असल्याचे लाड म्हणाले.
तुमचा कार्यक्रमदेखील 2017 मध्ये नक्की होता
सुधाकर घारे यांनी उल्लेख केला 2014 मध्ये करेक्ट कार्यक्रम झाला असता. वासरे परिसरामुळे मी निवडून आलो, त्याचे कदापि विस्मरण होणार नाही. 2017 मध्ये तुम्हाला पाडण्यासाठी तुमच्या शेजारी बसणारे कोण कोण फिरत होते, याचा शोध तुम्ही आता घेणार नाही. कारण, ते आता तुमचे जवळचे झाले आहेत, असा टोला लाड यांनी घारेंना लगावला.
पराभवाचे खापर फोडायला मीच दगड मिळालो का?
पराभवाने माणसे दुःखी होतात आणि त्यावेळी पराभवाचा नारळ फोडण्यात तुम्ही मला दगड बनवले, इतके तुम्ही दगड आहात याची खात्री झाली आहे, अशी बोचरी टीका घारे यांच्यावर केली.