। खरोशी । वार्ताहर ।
नुकतीच सातारा वाई येथे युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र व युनिफाईट वेलफेअर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवव्या राजस्तरीय युनिफाईट स्पर्धेत पेणच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
पेण, जोहे, जिते येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत शिहान रवींद्र म्हात्रे व सेन्साय प्रथमेश मोकल यांच्याकडे युनिफाईट या खेळाचे प्रशिक्षण घेत असलेले खेळाडू रितुल रवींद्र म्हात्रे, यश उदय जोशी, वंश संजय घरत, श्रीतेज मोरेश्वर पाटील, दिपेंद्र दीपक सावंत या चारही खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून आपल्या रायगड जिल्ह्यासोबतच पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, ईशान भोसले, महाराष्ट्र युनिफाईटचे अध्यक्ष संतोष खंदारे, सचिव डॉ. मंदार पनवेलकर, सातारा युनिफाईटचे अध्यक्ष संदीप शिंदे, सचिव नितीन तसेच जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. या विजयी स्पर्धकांची हिमाचल प्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.