। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नालधेवाडी येथील जमिनीची तातडीची मोजणी केली जात असताना तेथे आलेल्या भूमीअभिलेख कार्यालयाच्या कर्मचार्याला मारहाण करण्यात आली. शासकीय कर्मचार्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळे अशा गुन्ह्यात कर्जत पोलीस ठाणे येथे नालधेवाडीमधील 15 आणि चार अनोळखी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
13 एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता नालधेवाडीमधील शेतमालक तुकाराम महादू पादीर यांच्या नावे असलेली सर्व्हे नं. 28/हिस्सा 1 अ 1, 1 अ 2, 1 क, 2, 3, 4, 5 या जागेची अतितातडी हद्द कायम मोजणी केली जात होती. नालधे येथे मोजणी हद्द निश्चिती दाखविण्याचे काम करीत असताना यांतील आरोपींनी एकत्र गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय काम करताना अडथळे आणले. मंजुळा अण्णा पादीर यांनी फिर्यादी यांच्या हाताला धरून बाजूला ओढले, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले दिगंबर अण्णा पादीर, दत्तात्रेय अण्णा पादीर, कृष्णा अण्णा पादीर यांना अरेवारीची भाषा करून, नको ते आरोप करून तुम्हाला या ठिकाणी हद्द व निश्चिती करण्याचे काम करू देणार नाही, असे बोलून तुम्ही येथून निघून जा अशी धमकी दिली. त्यानंतर शिविगाळी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे म्हणून नालधेवाडीमधील अण्णा देऊ पादीर, मंजुळा अण्णा पादीर, दत्तात्रेय अण्णा पादीर, दिगंबर अण्णा पादीर, कृष्णा अण्णा पादीर, मनिषा जगन पादीर, अरुणा दत्ता पादीर, भारती भष्मा, ओमकार भष्मा, दुंधा हिरू पादीर, मंजुळा दुंधा पादीर, नागी आंबो पादीर, हरिभाऊ वसंत पादीर, रघुनाथ हिरू पादीर, अनिता रामदास पादीर आणि अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर कर्जत पोलीस ठाणे येथे भूमीअभिलेखचे कर्मचारी दिनेश प्रमोद राणे, भिसेगाव-कर्जत यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अथने या अधिक तपास करीत आहेत.






