सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत मुंबईच्या सर्व्हिसेसविरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हैदराबादमध्ये मुंबई आणि सर्व्हिसेस आमनेसामने आले होते, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने दमदार फटकेबाजी केली. मात्र, आयपीएल 2025 च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकुरने चार विकेट्स घेतल्या. परंतु पृथ्वी शॉने पुन्हा निराश केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने लवकरच खाते न उघडता बाद झालेल्या पृथ्वी शॉच्या रुपाने पहिली विकेट गमावली. त्याचवेळी कर्णधार श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनाही छाप पाडता आली नाही आणि दोघांनीही अनुक्रमे 20 आणि 22 धावा केल्या. यानंतर टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे भाग राहिलेले सूर्यकुमार आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे मुंबईला चार बाद 191 धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरा दाखल सर्व्हिसेस संघ 19.3 षटकांत 153 धावांवर गारद झाला. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने मुंबईच्या डावाची धुरा सांभाळली आणि सातत्याने मोठे फटके मारत संघाला संकटातून सोडवले. सूर्यकुमारने 46 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या, तर शिवमने 36 चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. विशेष म्हणजे आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वा सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सने 16.35 कोटी रुपयांत कायम ठेवले होते, तर चेन्नई सुपर किंग्जने शिवम दुबेला 12 कोटी रुपयांत संघात कायम ठेवले होते.
सूर्यकुमार यादव बहिणीच्याल लग्नानंतर दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतला. सूर्यकुमार स्पर्धेतील उर्वरित सामने खेळणार असून 21 डिसेंबरपासून सुरू होणार्या विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेतही तो सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमारने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली आणि भारताने चार सामन्यांची मालिका 3-1 अशा4 फरकाने जिंकली. त्या दौर्यात शिवम दुबे भारतीय संघाचा भाग नव्हता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ई गटात समाविष्ट असलेल्या मुंबईने तीनपैकी दोन सामने जिंकले आहे. मुंबईचे असून दोन सामने बाकी आहेत. भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत, ज्यात हार्दिक पंड्या, श्रेयस, तिलक वर्मा, रिंकू सिंग, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना होण्यापूर्वी सूर्यकुमार रणजी ट्रॉफीमध्येही खेळला होता.
