टी-20 संघाचे सूर्यकुमारकडे नेतृत्व

श्रीलंका दौर्‍यासाठी रोहित, कोहली एकदिवसीय संघात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारताचा नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या पहिल्याच संघ निवडीत काही आश्‍चर्यकारक निर्णय घेतले असून श्रीलंका दौर्‍यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी तारांकित अष्टपैलू हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदापासूनही दूर ठेवण्यात आले आहे. टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघांच्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली.

तसेच एकदिवसीय संघात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यात प्रत्येकी तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेचे सामने अनुक्रमे 27, 28 आणि 30 जुलैला, तर एकदिवसीय सामने अनुक्रमे 2, 4 आणि 7 ऑगस्टला कोलंबो येथे खेळविण्यात येणार आहेत. रियानला दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान मिळाले असून श्रेयस आणि केएल राहुल यांचा एकदिवसीय संघात समावेश आहे.

Exit mobile version