सूर्यकुमार यादव मुकणार मालिकेला

रोहितसमोर मोठे टेन्शन
। मुंबई । वृत्तसंस्था ।
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आतापर्यंत अनेक स्टार भारतीय खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. वेगवान गोलंदाज दीपक चहरनंतर आता सूर्यकुमार यादवलाही या टी-20 मालिकेत खेळता येणार नाही. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे टी-20 मालिकेतील कोणत्याही सामन्यात खेळू शकणार नाही.

सूर्यकुमार यादव श्रीलंका मालिकेसाठी लखनऊमध्ये होता. तो सराव करतानाही दिसला. मात्र, आता त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याला ही दुखापत कशी आणि केव्हा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही, पण वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाल्याचे समजते.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडणारा सूर्यकुमार यादव हा दुसरा खेळाडू आहे. याआधी वेगवान गोलंदाज दीपक चहरही संघाबाहेर झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात त्याला दुखापत झाली होती. श्रीलंकेचा संघ भारतात तीन टी-20 सामने खेळणार असून दोन कसोटी सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत दीपक चहर संघाबाहेर होणे, हा मोठा धक्का आहे. स्विंग गोलंदाजीशिवाय चहरने फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Exit mobile version