| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
आयपीएल 2024 मध्ये मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. लागोपाठ तीन पराभवाचा सामना कऱणाऱ्या मुंबईसाठी अखेर आनंदाची बातमी आहे. फलंदाज सूर्यकुमार यादव तंदुरुस्त होऊन संघात दाखल झाला आणि शुक्रवारी त्याने जोरदार सरावही केला.
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव सहभागी होऊ शकला नाही. अगोदर गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतर स्पोर्टस हार्निया अशा दुखापती झालेला सूर्यकुमार गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. मात्र, दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एनसीएकडून सूर्यकुमार यादव याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. शुक्रवारी सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात जोडला गेला असून त्याने सरावाला सुरुवातही केली. सात एप्रिल रोजी, दिल्लीविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव प्लेईंग 11 मध्ये असणार आहे. त्यामुळे पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.