। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसीने बुधवारी (दि.26) ताजी टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीनुसार आता फलंदाजांच्या यादीत मोठे बदल झाले असून भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. मात्र, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी मोठी झेप घेतली आहे.
टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीनंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली आहे. या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमारच्या कामगिरीत फारसे सातत्य दिसले नाही. त्याला गेल्या काही काळातील कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका बसला असून आता त्याला टी-20 फलंदाजी क्रमवारीतील ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेडने मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता हेड अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. सूर्यकुमार डिसेंबर 2023 पासून टी फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. पण अखेर टी वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीमुळे हेडने त्याच्याकडून हे स्थान मिळवले आहे. हेडने या क्रमवारीत 4 स्थानांची उडी घेत सूर्यकुमारसह फिल सॉल्ट, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनाही मागे टाकले आहे.