मद्यपान करणार्‍या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागच्या प्रांत कार्यालयात मद्यपान करणार्‍या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी याबाबतची माहिती दिली. कर्मचार्‍यांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 25 नोव्हेंबरला अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात पाच कर्मचारी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर दारू पित असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. शिवराज्य ब्रिगेडच्या निलेश पाटील यांनी याबाबतचा व्हिडीओ समोर आणला होता. कार्यालयात दारूच्या पार्ट्या झोडणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. यावेळी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे आणि अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा…..
दरम्यान मद्यप्राशन करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करा या मागणीसाठी निलेश पाटील यांनी 1 डिसेंबर 21 ला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात एकूण 18 जण सहभागी होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

Exit mobile version