परवाना अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई

इतर अधिकारी व सोसायटी पदाधिकार्‍यांवर कारवाई कधी?
उरण | वार्ताहर |
उरणमधील मत्स्य परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांच्यावर मासेमारी बंदी काळात मच्छिमार सोसायटीच्या पदाधिकारी वर्गाशी हातमिळवणी केल्याची व्हिडीओ ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तसेच कामचुकारपणा करून मच्छिमारांशी हातमिळवणी केल्याचा ठपका मत्स्यविभागाच्या आयुक्त कार्यालयाने ठेवून दाभणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबत जिल्ह्यातील अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला, तर आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु, इतर वरिष्ठ अधिकारी दोषी नाहीत का? असा सवाल यानिमित्ताने उभा राहात आहे. लवकरच माहितीच्या अधिकारात हे उघड होणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, वरिष्ठांनी आपली कातडी वाचविण्यासाठी दाभणे यांना बळीचा बकरा बनविल्याची माहिती सोसायटीच्या एका माजी पदाधिकर्‍याने दिली.


मासेमारी बंदीचा काळ म्हणजे माशांचा प्रजोनाचा कालावधी असतो. त्यामुळे या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. परंतु उरणमध्ये याचे सर्रासपणे उल्लंघन होऊन मासेमारी खुलेआम सुरू होती. याबाबतचे वृत्त अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी काही बोटींवर थातुरमातुर कारवाई करण्यात आली होती. कारवाई करण्यात आलेल्या बोटींची माहिती उरण परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांच्याकडे मागितली असता ती त्यांनी देण्यास नकार दिला होता.
याबाबत रायगड मत्स्यविभाग आयुक्त सुरेश भारती यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देऊन सदर कार्यवाही आयुक्तालय कार्यालय मुंबई येथून केली असून, ते अधिकृत माहिती देऊ शकतील, असे सांगितले.

Exit mobile version