शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शासकीय गुरचरण जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत रेवदंड्यातील उपसरपंच मंदा बळी व सदस्य दिक्षा बळी असे दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सदस्य पद रद्द करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. अलिबागमधील त्यांच्या दालनात झालेल्या अंतिम सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला. रेवदंडा येथील अर्जदार सुशील सुर्वे यांच्या वतीने ॲड. परेश देशमुख यांनी काम पाहिले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भाजपच्या उपसरपंच मंदा माणिक बळी आणि दिक्षा अजित बळी यांना दणका मिळाला आहे.
ॲड. परेश देशमुख यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेवदंडा ग्रामपंचायतीची 6 नोव्हेंबर 2023 मध्ये निवडणूक झाली. या निवडणूकीत मंदा माणिक बळी व दिक्षा अजित बळी निवडून आल्या. मंदा बळी यांच्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, मंदा बळी यांचा मुलगा नंदलाल बळी यांनी मोठे बंदर येथे शासकीय गुरचरण जागेतील 67.17 चौ. मीटर क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले. घर क्रमांक 3084 आहे. तसेच सदस्य दिक्षा बळी यांचे पती अजित बळी यांनी 20.91 चौ.मी. क्षेत्रामध्ये बांधकाम करून घर बांधले. घर क्रमांक 3204 हे आहे. उपसरपंच मंदा बळी आणि सदस्या दिक्षा बळी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत आगलेचीवाडी थेरोंडा येथे बांधकाम केल्याची तक्रार रेवदंडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील सुरेश सुर्वे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. शासनाची जागा माहित असतानादेखील त्यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम केल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी ॲड. परेश देशमुख यांच्यामार्फत जिल्हाधिकारी न्यायालयात अपिल दाखल केले. या तक्रार अर्जावरील सुनावणी शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली.ॲड. परेश देशमुख यांनी सुर्वे यांच्या बाजूने केलेला युक्तीवाद व पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मंदा बळी आणि दिक्षा बळी यांना दोषी मानत त्यांचे उपसरपंच व सदस्य पद रद्द करण्याचे आदेश दिले. अतिक्रमण व बांधकाम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने रेवदंडा येथील उपसरपंचासह सदस्याला दणका मिळाला आहे. या निर्णयाकडे रेवदंडामधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. या निकालाबाबत ॲड. परेश देशमुख व तक्रारदार सुशील सुर्वे यांचे तसेच याप्रकरणात संतोष उर्फ बाबू मोरे यांनी पुरावे व अन्य कागदपत्रे गोळा करून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
