Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचा दणका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी निलंबनाची कारवाई केल्याने रायगड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग परिसरात एका व्यक्तीकडून एका तरुणीचा दुचाकीवरून वारंवार पाठलाग केला जात होता. आरोपी सतत हॉर्न वाजवत तिचा मानसिक छळ करीत होता. तसेच तिच्याशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून संबंधित पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस कर्मचारी ज्योत्स्ना मासे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, फिर्यादी महिलेला न्याय आणि मदत करण्याऐवजी आरोपीलाच वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी थेट पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एसपी दलाल यांनी तात्काळ चौकशी करून मासे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली.

या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता अधिक गंभीर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ज्योत्स्ना मासे या सध्या अलिबाग पोलीस ठाण्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. यापूर्वी त्या अलिबाग पोलीस ठाण्यातच कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती. मात्र, प्रतिनियुक्तीवर त्या पुन्हा गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना, त्याच विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच दुर्लक्ष होत असेल, तर सामान्य महिलांनी न्यायासाठी नेमके कोणाकडे धाव घ्यायची? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कर्तव्यात हलगर्जीपणा आणि कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर भूमिका घेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आतापर्यंत सातहून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलात शिस्तीचा बडगा अधिक कडक झाल्याचे चित्र आहे.


संबंधित पीडित महिलेच्या प्रकरणात चार तासांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

ज्योत्स्ना मासे,
पोलीस कर्मचारी
Exit mobile version