चेंढरे, वरसोली हद्दीतील भूमिगत कामांचा खोळंबा

कामे लवकर संपवा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

| मुंबई | दिलीप जाधव |
अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोलीली ग्रामपंचायत हद्दीतील 83 कोटींची भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, याबाबत शेकाप आ. जयंत पाटील यांनी पाठपुरावा केला असून, त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आ. पाटील यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानुसार हे काम जलद गतीने करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामाचे कार्यादेश दि. 13/09/2019 रोजी दिलेले असून, कोविड-19 च्या प्रभावामुळे कामाचा वेग मंदावला होता. स्टेट प्रोजेक्ट इम्पलिमेंटेशन युनिट, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प कक्षला यावर कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. या प्रकल्पांमध्ये चेंढरे व वरसोली गावाच्या काही भागांची कामे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच खोदाई करण्यात आलेले रस्ते माती दगड भराव करून बुजविण्यात आलेले आहेत. आजपर्यंत 69.88 कोटींचे काम पूर्ण झालेले आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी सरकारने मे. लीना पॉवरटेक इंजीनियरस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस दि. 14 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली असून, संबंधित ग्रामपंचायतींकडून या कामांचे ना-हरकत दाखले संबंधित ठेकेदाराला मिळाले आहेत. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प-2/अंतर्गत काम प्रगतीपथावर असून, विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला महावितरण कंपनीने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

Exit mobile version