| पालघर | प्रतिनिधी |
ओमानच्या समुद्रातून कंटेनर वाहून नेणाऱ्या एम. व्ही. फोनिक्स 15 या मालवाहू जहाजाला ऑगस्टमध्ये जलसमाधी मिळाली होती. जहाजवरील कंटेनर अरबी समुद्रात भरकटले होते. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना इशाराही दिला होता. आता हे कंटेनर शिरगाव सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर लागले असून, ते ओमानमधील त्याच जहाजावरील असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सातपाटी येथे दोन तर शिरगाव येथे एक कंटेनर समुद्र प्रवाहासोबत वाहून आला आहे.
फोनिक्स 15 या मालवाहू जहाजाला ओमान येथे जलसमाधी मिळाल्यानंतर त्यातून भरकटलेले कंटेनर प्रवाहासोबत पालघर तसेच गुजरातच्या किनाऱ्यावर येण्याची शक्यता मत्स्यव्यवसाय विभागाने वर्तविली होती. अर्धवट तरंगणाऱ्या कंटेनरपासून बोटींना धोका होण्याची शक्यताही सांगण्यात आली होती. हे कंटेनर तरंगत सातपाटी व शिरगाव समुद्रासमोर खडकात अडकले आहेत. किनाऱ्यावर आलेले हे कंटेनर नेमके कसे, कुठून आले. त्यात काय आहे, याबाबत स्थानिक यंत्रणा व पोलीस शोध घेत आहेत. रविवारी समुद्राला सकाळी भरती असल्याने कंटेनरपर्यंत पोचणे सुरक्षा यंत्रणांना कठीण होते. मात्र, ओहोटीनंतर कंटेनरपर्यंत पोचणे शक्य झाल्यानंतरच त्यांची तपासणी व त्याबाबत सुरक्षितता कळणे शक्य असल्याचे सातपाटी सागरी पोलिसांनी सांगितले.







