। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी, दरोडा, महिलांवर अत्याचार, लहान मुलींवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे घडत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नाते गावातील एका वाड्याजवळ 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सापडला आहे. लीलावती राजाराम बलकावडे राहणार नाते तालुका महाड असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून, सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. लीलावती बलकवडे यांचा मृतदेह वाड्या शेजारी सापडला मात्र त्यांच्या अंगावर असलेले दागिने नसल्यामुळे सदरचा मृत्यू हा संशयास्पद झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. महाड ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून, जोपर्यंत चोरी करून खून करणाऱ्या आरोपीला पोलीस पकडून कठोर शिक्षा देत नाहीत. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन व फॉरेन्सिक टीम दाखल झाले असून, या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.







