सुतारवाडी धरणाने गाठला तळ

अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट

| सुतारवाडी | वार्ताहर |

कधी नाही तर यावर्षी सुतारवाडी येथील धरणाच्या पाण्याची पातळी घटली असून, अनेक गावांना, फार्म हाऊसना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळणार्‍या पाण्याची पातळी एप्रिल/मे महिन्यातच कमी झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाने तळ गाठल्याने अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असून, पहिल्यांदाच पाण्याची पातळी घटल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सुतारवाडी येथे लघुपाट बंधारा योजनेंतर्गत 1977 साली धरण पूर्ण बांधून तयार झाले. या धरणाची लांबी 325 मीटर असून, उंची 16.39 मीटर एवढी आहे. 1977 पासून आजतागयत या धरणाचा गाळ काढलेला नाही, त्यामुळे पाणीसाठाही कमी आहे. सध्याची स्थिती पाहता, एकूण पाणीसाठा 2.320 द.ल.घ.मी. असून, उपयुक्त पाणीसाठा 2.264 द.ल.घ.मी. तर निरुपयोगी पाणीसाठा 0.056 द.ल.घ.मी एवढा आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 9.84 चौरस किलोमीटर, तर एकूण लाभ क्षेत्र 340 हेक्टर आहे. 6 मे रोजी पाण्याची पातळी 89.69 तर उपयुक्त पाणीसाठा 0.750 द.ल.घ.मी एवढा आहे. पाण्याची पातळी 90.49 असून, उपयुक्त पाणीसाठा 1.034 द.ल.घ.मी आहे. येथील धरणाचा गाळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सुतारवाडी, येरळ, जामगाव, दूरटोली, कुडली, सावरवाडी, धगडवाडी या गावांना येथील धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असतो. तसेच या परिसरात अनेक फार्म हाऊस आहेत, त्यांनाही मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. पाण्याखालील गाळ काढण्यास पाणीसाठा अधिक होऊन पाण्याची पातळी निश्‍चितपणे वाढेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version