| अलिबाग | प्रतिनिधी |
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवून मेहनत केली, तर यश अटळ आहे, असे प्रतिपादन कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे यांनी केले आहे. अलिबाग येथील स्पर्धा विश्व अकॅडमीत विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला रायगड भूषण धनंजय कवठेकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुयोग आंग्रे यांनी आपल्या वक्तव्यातून स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, प्रश्नांची पद्धत, सध्याच्या घडामोडींचे महत्त्व, वर्तमानपत्राचे वाचन, नोट्स तयार करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या पत्रकारितेतील अनुभवातून मिळालेली शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आत्मविश्वास वाढवला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शासकीय नोकरी मिळवणे हेच ध्येय न ठेवता समाजात परिवर्तन घडवण्याचा दृष्टीकोन ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच, यश मिळवायचे असेल, तर अडथळ्यांना घाबरू नका, त्यांचा सामना करा, अशा प्रेरणादायी शब्दांत कृषीवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तपस्वी गोंधळी आणि रायगड भूषण तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी यांनी केले होते. स्पर्धा विश्व अकॅडमीने अशा प्रकारच्या मार्गदर्शन सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम सुरू ठेवले असून भविष्यातही विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.







