शेतीच्या कामाबरोबरच खाद्य संस्कृतीशी जोडली नाळ
। पाली । धम्मशील सावंत ।
स्वीडनमधील दाम्पत्य चक्क सुधागड तालुक्यातील उद्धर येथील एका छोट्या गावात राहून शेतीची कामे करत आहेत. एवढेच काय तर इथले जेवणदेखील बनवायला शिकले आहेत. अवघ्या काही दिवसांत येथील ग्रामीण संस्कृतीशी व निसर्गाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.
टायबेरिअस व त्याची पत्नी आमंडा स्वीडनवरून चार दिवसांपूर्वी येथे आले आहेत. येथील तुषार केळकर यांच्या आत्मतृप्ती या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये ते वास्तव्य करत आहेत. बांबूने बनवलेल्या व शेणाने सारवलेल्या झोपडीत अतिशय कमी संसाधनाचा वापर करून हे स्विडीश दाम्पत्य राहत आहेत. शिवाय येथे फक्त सौर उर्जेवर वीज मिळते. त्यामुळे अगदी नेमके विजेचे दिवे व एक फॅन उपलब्ध आहे.
टायबेरिअस हा स्वीडन येथील एका शाळेत शिक्षक असून आमंडा ही स्वीडन येथील सुपर मार्केटमध्ये काम करते. आमंडा पहिल्यांदाच भारतामध्ये आली आहे. तर टायबेरीयस हा दुसर्यांदा भारतात आला आहे. या दोघांची तुषार केळकर यांच्यासोबत सोशल मीडियाद्वारे मैत्री झाली आणि ते थेट येथे येऊन पोहोचले. 22 डिसेंबरला ते येथून राजस्थान येथे जाणार आहेत. भारतातील ग्रामीण जीवन तसेच सांस्कृतिक विविधता हे सर्व त्यांना जाणून घ्यायचे आहे. सध्या ते शेती बरोबरच स्वयंपाक आणि इतर सर्व कामे देखील हे दांपत्य अगदी आनंदाने करत आहेत.
भाजीपाला, कलिंगडाच्या शेतीची मशागत
तुषार यांनी आपल्या शेतामध्ये कलिंगड लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी जमिनीची मशागत करणे, मातीचे आळे बनवणे आणि कलिंगडाच्या बिया लावणे, त्यांना पाणी देणे आदि कामे टायबेरियस व त्याची पत्नी आमंडा मन लावून करताना दिसत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवडदेखील या दांपत्यांनी केली आहे. शेतीची विविध कामे करण्यात ही दांपत्य रामतांना दिसत आहेत. त्यांच्या जोडीला तुषार केळकर यांचा छोटा मुलगा राहीदेखील मदत करतो.
खाद्य संस्कृतीची ओळख
अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या दाम्पत्यांनी येथील जेवण बनवण्याची पद्धत देखील तुषार केळकर यांच्याकडून शिकून घेतली. आमटी, भात, पोळी भाजी, अंडा बुर्जी असं सर्व काही हे दाम्पत्य स्वतः करतात. त्यांना आपल्या येथील अन्नपदार्थाची चव खूप आवडू लागली आहे. येथील मसाल्यांवर त्यांचे प्रेम जडले आहे.