तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय; एकदिवसीय मालिका 2-1 ने खिश्यात
| विशाखापट्टणम | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (दि.6) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात भारताने 9 गडी राखत विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. हा 2025 वर्षातील भारताचा अखेरचा एकदिवसीय सामना होता. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाने वर्षाचा शेवट गोड केला. यावेळी यशस्वी जैस्वालने एकदिवसीय पहिलं वहिलं शतक ठोकले. तर, विराट कोहली आणि रोहित शर्माने अर्धशतके साकारली. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीत चमक दाखवली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. रोहितने नंतर आक्रमक खेळायलाही सुरुवात केली होती. दोघांमध्ये दीडशतकी भागीदारीही झाली. मात्र, रोहित शर्मा 75 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने जैस्वालची भक्कम साथ दिली. सुरुवातीला संघर्ष करणाऱ्या जैस्वालने अर्धशतकानंतर धावांची गती वाढवली. त्यातच दुसऱ्या बाजूने विराटने सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान जैस्वालने 111 चेंडूत एकदिवसीय सामन्यातील आपले पहिलं वहिलं शतक पूर्ण केले. त्याच्या शतकानंतर विराटने अर्धशतक पूर्ण केले. यावेळी जैस्वाल आणि विराट यांच्यातही नाबाद शतकी भागीदारी झाली. अखेर विराटने 40 व्या षटकात विजयी धाव काढली. यावेळी जैस्वाल 116 धावांवर तर विराट 65 धावांवर नाबाद राहिला.
तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 47.5 षटकात सर्वबाद 270 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 89 चेंडूत 106 धावांची खेळी केली. तसेच, तेंबा बावुमाने 48 धावा केल्या. मॅथ्यू ब्रिट्झके (24), डेवाल्ड ब्रेव्हिस (29) यांनी चांगली सुरुवात केली, परंतु त्यांना मोठ्या धावा करता आल्या नाहीत. केशव महाराज 20 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. तर, अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
20 हजारांचा टप्पा पूर्ण
या सामन्यात रोहित शर्माने 7 षटकापर्यंत कोणताही मोठा शॉट खेळला नव्हता. मात्र, 8 व्या षटकात लुंगी एनगिडीविरुद्ध रोहितने षटकार खेचला. त्यानंतर रोहित त्याच्या लयीत खेळताना दिसला. त्यानंतर 14 व्या षटकात रोहितने चौथ्या चेंडूतवर एकेरी धाव घेत 27 धावा पूर्ण केली. ही धाव रोहित शर्मासाठी विक्रमी धाव ठरली. कारण 27 धावा पूर्ण करताच रोहितने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. 2007 मध्ये पदार्पण केलेल्या रोहितने 505 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील 538 व्या डावात खेळताना 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा चौथाच भारतीय आहे. यापूर्वी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली या तिघांनीच केला आहे. तसेच, 20 हजार धावा करणारा रोहित जगातील 14 वा खेळाडू ठरला आहे.
रोहि-राट पुन्हा कधी खेळणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका आता संपली. या मालिकेत भारतीय संघाचे दोन माजी कर्णधार विरोट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्येच खेळतात. त्यामुळे ते पुन्हा निळ्या जर्सीमध्ये कधी खेळताना दिसतील? अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. दरम्यान, भारतीय संघाचर पुढील एकदिवसीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पुढील वर्षी 11 जानेवारी रोजी वडोदरा येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेपूर्वीही कोहली आणि रोहित मैदानावर खेळताना दिसू शकतात. तसेच, बीसीसीआयने या दोन्ही दिग्गजांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते 24 डिसेंबर रोजीही मैदानावर दिसू शकतात.







