बाजारपेठेत चॉकलेट राखीची क्रेझ
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठ सजल्या आहेत. लहानग्यांना राख्यांचे अधिक आकर्षण असते. लहानग्यांसह मोठ्यांना देखील चॉकलेट आवडते. सध्या चॉकलेट राखीची क्रेझ पाहायला मिळत आहे. या राख्या शाळा व कॉलेजमधील मुलं-मुुली सगळ्यात जास्त पसंत करतात. बांधा आणि खा, सणाचा गोडवा अशाप्रकारे मिळवा, असे होत आहे.
पर्यावरण स्नेही, स्वस्त व उपयुक्त अशा विविध आकाराच्या चॉकलेट राख्यांना मागणी वाढली आहे. पालीतील चॉकलेट राख्या निर्मात्या निवेदिता भावे यांनी सांगितले की, चॉकलेट लहान मुलांमध्ये प्रिय आहे. चॉकलेट राखी हातावर बांधून वरचे चॉकलेट काढून खाता येते. खाली असलेली रंगीबेरंगी रीबीन हातालाच राहते. म्हणजे राखी हातालाच राहते. प्लास्टिकच्या राख्यांपेक्षा कचरा कमी होतो. चॉकलेट दर्जेदार वापरले जाते. व ते तब्बल 20 दिवस टिकते. नेहमीच्या राख्यांपेक्षा काहीतरी वेगळा सेलिब्रेशनचा आनंद मिळतो आणि बच्चेकंपनी देखील खुश होते. या राख्या साधारण 25 ते 30 रुपयांपासून पुढे मिळतात. त्यामुळे इतर राख्यांच्या तुलनेत त्या खूप स्वस्त आहेत. या राख्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आगाऊ बुकिंग केली असल्याचे निवेदिता यांनी सांगितले.
विविध आकारांमध्ये उपलब्ध
विविध आकार, नक्षीकाम, रंग व ड्रायफ्रूट चॉकलेट राख्या गोल, त्रिकोणी, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच चॉकलेटी, गडद काळे, चंदेरी व सोनेरी अशा रंगांमध्ये आणि नक्षीकाम असलेल्या आहेत. याबरोबरच यात डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, ड्रायफ्रूट आणि बिस्कीट राखी असे प्रकार आहेत. चॉकलेटवर काजू, बदाम, पिस्ता असे वेगवेगळे ड्रायफूट लावलेल्या असणार्या असल्याने या राख्या चवीबरोबरच आरोग्यदायी सुद्धा आहेत. राखीचा बँड मखमली कापडाचा व विविध आकर्षक रंगाचा असल्यामुळे लहानग्यांना खूप आवडतो. वेगवेगळे आकार, भाई, भाऊ, दादा, ब्रो अशी नावे देखील आहेत.