घारापुरी ते करंजा जेट्टी अंतर निर्धारित वेळेआधी पोहून पार
। उरण । प्रतिनिधी ।
करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी 18 कि.मी. अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत, पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. मयंकने 3 डिसेंबर रोजी धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता. ज्यामुळे तो हा प्रवाह पोहून जाणारा पहिला जलतरणपटू ठरला होता. तर, यावेळी घारापुरी ते करंजा जेट्टी हा प्रवाह पोहून जाणारा मयंक पहिला जलतरणपटू ठरला असून, त्याने यानिमित्ताने नवा इतिहास रचला असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेट शाळेतील सहाव्या इयत्तेत शिकणारा मयंक हा उत्कृष्ट जलतरणपटू असून, समुद्रीय जलतरण हा त्याचा आवडता प्रकार आहे. समुद्र किनारी लागून असणार्या करंजा, कोंढारीपाडा येथे राहणार्या या 11 वर्षीय चिमुकल्याने आज नवा विक्रम केला आहे. 3 डिसेंबरच्या मध्यरात्री 1.04 मिनिटांनी मयंकने जगविख्यात घारापुरी बंदर येथून समुद्राच्या लाटांना आव्हान देत करंजा जेट्टी गाठली आणि पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला. सागरी 18 किमी अंतर त्याने निर्धारीत वेळेपेक्षा अर्धा तास आधी पोहून पूर्ण केले आहे. हा प्रवाह पोहून जाण्यासाठी 6 तासाचा अवधी अपेक्षित होता. तर मयंकने हे अंतर 5 तास 29 मिनिटात पोहून पार करत सर्वांनाच चकित केले आहे.रायगड, मुंबई विभागातील समुद्रीय जलप्रवाहातील दोन प्रवाहांवर मयंकने आपले नावं कायमस्वरूपी कोरले आहे.
यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी, शैलेश सिंग, सचिन डाऊर, नितीन कोळी, एल.बी. पाटील, सीमा घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रीतम म्हात्रेंकडून सत्कार
मयंकच्या या यशाबद्दल शेकापचे युवानेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी उरणकरांसाठी खेळाचे मैदान नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानुसार आपण उरणकरांसाठी हक्काचे खेळाचे मैदान मिळावे यासाठी पाठपुरावा करून तो नक्कीच मार्गी लावू, असा विश्वास व्यक्त करून मयंक म्हात्रे याचे अभिनंदन करून यापुढे कोणत्याही क्षेत्रातील खेळाडूने उरणचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आपणही पुढाकार घेऊ असे सांगितले. यावेळी मयंक म्हात्रे याच्या यशाबद्दल त्याचे अनेकांनी सत्कार व अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.