वडखळ सरपंचावर कारवाईची टांगती तलवार

गुरुवारी होणार सुनावणी
| पेण | वार्ताहर |
वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रा.पं. सदस्य विवेक म्हात्रे व विनोदिनी कोळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. 

या सुनावणीच्या वेळी विवेक म्हात्रे व विनोदिनी कोळी यांनी जे आरोप केले आहेत, त्यामध्ये ग्रामपंचातीने विलास पवार यांना कचरा ठेकेदार म्हणून लाखो रुपयांची रक्कम बेकायदेशीररित्या अदा करणे, त्यानंतर ग्रामपंचायतीने वसूल केलेल्या 4 लाख 78 हजार 539 रु. ग्रामनिधीमध्ये जमा न करता परस्पर रोखीने खर्च करणे, मासिक सभेत सदस्य हजर नसताना सूचक व अनुमोदक म्हणून नावे दाखविणे, विहीर दुरुस्ती कामामध्ये रोख रकमा देणे, यासह इरतही केलेल्या आरोपासंदर्भात परिपूर्ण माहितीसह सुनावणीला हजर राहण्याचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे आले असून, सदरील प्रकरण राजेश मोकल यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून राजेश मोकल हे संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे येत आहे; परंतु जर ग्रामपंचयात भ्रष्टाचारप्रकरणी राजेश मोकल यांच्यावर कारवाई झाल्यास पुढील राजकीय प्रवास कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. राजेश मोकल यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39 (1) नुसार कारवाइची टांगती तलवार आहे.

Exit mobile version